बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली.

राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयानेच फाडला आहे. कारण बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याचा अहवाल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली.

बुलडाण्यातील सुलतानपुर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. मात्र, नारळासमोरील बटन दाबल्यास कमळाच्या चिन्हावर लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

2017 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. याशिवाय पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळालं होतं. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएममध्येच घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. ईव्हीएम मशिनमधील कोणतंही बटण दाबल्यास भाजपलाचं मत दिलं जातंय, असा आरोप विरोधकांनी केला होता.

पण निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले होते. विशेष म्हणजे, आयोगानं विरोधकांना ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्याचं आव्हानही दिलं होतं. हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्यानिस्ट पक्षानं उचललं होतं.

यासाठी आयोगाच्या वतीनं आयोजित हॅकेथॉनमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड करुन दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांना चार-चार तासाचा वेळ दिला होता. पण दोन्ही पक्ष हे आव्हान पूर्ण करण्यात असमर्थ ठरले होते.

पण आता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानंच आयोग आणि भाजपच्या यशाचा बुरखा टराटरा फाडला आहे. ईव्हीएम मशीनमधील कोणतंही बटण दाबल्यास कमळाच्या चिन्हा समोरचा लाईट लागत असल्याचं चौकशी अहवालात नमुद केलं आहे.