विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासप) अर्ज भरल्यानंतर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज भाजपकडून मिळालेल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. एका पक्षाचा आमदार असताना दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी भरल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्ष अपात्र ठरण्याचा धोका असल्याने त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

आमदारकीचा राजीनामा दिला तरी त्यांच्या उमेदवारीचा पेच मात्र कायम आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणूकीतून अतिरिक्त उमेदवार म्हणुन जानकर माघार घेणार की पृथ्वीराज देशमुख…याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीकडून घेतला जाणार असल्याने टांगती तलवार कायम आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार सहज निवडुन येत आहेत. यात भाजपने मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली. तर पृथ्वीराज देशमुख यांनी सहावा उमेदवार म्हणुन अर्ज भरला आहे. दोन वर्षापुर्वी जानकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडुन आले होते. त्यामुळे त्यांच्यावर रासपमधुन प्रचंड टीका झाली होती.

ही चुक परत होऊ नये यासाठी जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासपाकडून उमेदवार अर्ज भरला आहे. परंतू, भाजपच्या आमदारकीचा राजिनामा न देता रासपाचा अर्ज भरल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्षांची बंदी असती, त्यामुळे जानकर यांनी गुरुवारी सकाळी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यानंतर रासपाचा अर्ज भरला. आज विधानपरिषदेत सभापतींनी निवेदन करून जानकरांचा राजीनामा मान्य केला.

भाजपाचा आमदार झालो तेंव्हाच पुढच्या निवडणुकीत मी रासपकडून निवडणूक लढवणार, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच एक घटक पक्ष आहे व पुढेही राहणार आहे. महाराष्ट्रात रासपचे 95 नगर परिषद सदस्य आहेत. आमचे दोन आमदारही आहेत. देशात सतरा राज्यात माझ्या पक्षाचे काम आहे. आमच्या पक्षाला भाजपाचा मित्र पक्ष म्हणून पुढे निवडणुकाही लढवायच्याच आहेत. त्यामुळे मी माझ्याच पक्षाच्या तिकिटाखाली परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व त्याला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ही निवडणुक 100टक्के बिनविरोध होणार असे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.जानकरांनी माघार घेतली तरी त्यांच्या मंत्रीपदाला सहा महिने धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.