आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता धनगर समाजानेदेखील मराठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात म्हणून १ ऑगस्टला पुण्यात ‘अखेरची लढाई ’ या बॅनरखाली परिषद होणार असून त्यानंतर सलग १०० दिवस म्हणजे १० डिसेंबरपर्यंत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती या परिषदेचे समन्वयक गोपीचंद पडळकर यांनी दिली. पडळकर हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष असून भाजपला हा घरचा आहेर असल्याचे समजले जात आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्य सरकारने विधानसभेमध्ये धनगड व धनगर हे वेगवेगळे समाज आहेत. या दोन्ही समाजांच्या चालीरिती वेगळ्या असून त्या एकजात नाहीत, असे स्पष्ट केले आहे. या उलट धनगड म्हणजेच धनगर आहेत असे आमचे म्हणणे आहे . आम्ही राज्यातील ३५८ तहसिलदारांना धनगड दाखला दिला आहे काय? असा प्रश्‍न विचारला होता. ३६ जिल्हाधिकार्‍यांनादेखील आम्ही हाच प्रश्‍न विचारला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जात पडताळणी प्रमुखांनादेखील आम्ही हा प्रश्‍न विचारला. जनगणनेचीही माहिती घेतली. त्यावेळी धनगड जातीचा एकही दाखला राज्यात दिला गेलेला नाही, तर त्यांची लोकसंख्या जनगणनेत निरंक अशी सांगितली गेली, याचाच अर्थ राज्यात जो धनगर समाज आहे तोच खरा आहे . धनगड अशी जात नाही. याच मुद्यावर आता आमचे आंदोलन तीव्र होईल.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी त्वेषाने रस्त्यांवर उतरला असताना आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सत्ता आल्यानंतर वर्षभरात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपा सरकारने गेली चार वर्षे टिसच्या (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स) अहवालाचा संदर्भ देत वेळकाढूपणा केल्याने राज्यभरातील धनगर समाज संतप्त झाला आहे.