सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे आठ जणांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या नवऱ्याला कारमध्ये बांधून या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे ही संतापजनक घटना घडली. पीडीत महिला साताऱ्यातील माण तालुक्यातील आहे. ही महिला आणि तिचा नवरा पोटापाण्यासाठी तुरची फाटा येथे राह्यला आले होते. त्यांनी या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप्याची गरज होती. त्यांनी त्याबाबत काही ग्राहकांना सांगूनही ठेवले होते. मुकुंद माने नावाच्या संशयित व्यक्तीने या महिलेच्या पतीला फोन करून कामासाठी जोडपं मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुरची फाट्यावर दोघांनाही बोलावून घेतलं. येताना सोबत २० हजार रुपये आणण्यासही सांगितले होते. त्यानुसार सदर महिला आणि तिचा पती तुरची फाट्यावर गेले असता आठ जणांनी या दोघांना प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली. त्यानंतर या महिलेच्या पतीला कारमध्ये बांधून डांबले आणि या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी या महिलेने मोठमोठ्याने टाहो फोडला. ‘मी आठ महिन्याची गर्भवती आहे. मला सोडा… मला सोडा…’ अशी गयावयाही या महिलेने केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या महिलेने सदर घटनेची तासगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं सांगतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर शिवसेना प्रवक्त्या, आमदार नीलम गो-हे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच महिला दक्षता समित्या आणखी सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई आणि सांगलीतील आरोपींच्या शिक्षेचं प्रमाण ८ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर गेल्याचंही गो-हे यांनी निदर्शनास आणून दिलं.