राज ठाकरेंचे पुन्हा महाराष्ट्र सरकार वर “फटकारे”

शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे. आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. शेतकरी प्रश्नावर भाष्य करणारे हे चित्र आहे. या चित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे. दोघांनीही साडी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय, शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.

दोघंही शेतकऱ्याला पाडव्यानिमित्त ओवाळायला आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्याला बजावते की, ऐका…आत्ताच सांगून ठेवते ! एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!, अशा आशय राज ठाकरेंनी चित्राद्वारे मांडला आहे.

शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून, अशी आश्वासनं शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली, मात्र अद्यापपर्यंत एकाही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे.सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे, केवळ निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना शेतकऱ्यांची-मतांची आठवण होते, तर त्यांना दमडीही देऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे हाणला आहे.