मुंबई : विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. तीन दिवस उलटूनही महापालिकेला यावर कुठलाही तोडगा काढता आलेला नाही. गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सलग सात तास चाललेल्या बैठकीत या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरल्याने आज चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचारी संपावर आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा संप आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. तर महापालिका कामगार संघटनेनेही या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शनिवारपासून संपावर जाण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला.

आधी बेस्टचा वाहतूक विभाग आणि आता विद्युत विभाग संपावर गेल्याने मुंबईकरांचे मात्र आणखी हाल होणार आहेत. वाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना कदाचित बत्ती गुलचाही त्रास सहन करावा लागू शकतो.

बस बंद असल्याने प्रवाशांना कामावर जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातच टॅक्सीचालकांच्या मुजोरीनेही मुंबईकर त्रस्त झाले आहेत. बेस्ट संपाचा गैरफायदा घेत टॅक्सी चालक प्रवाशांकडून मनमानी पैसे घेत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी बगायला मिळत आहे.

गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापालिका आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापक आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात सलग सात तास चर्चा होऊनही या संपावर तोडगा निघाला नाही.

“आम्ही बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या, मात्र, समोरुन कोणताच प्रस्ताव ठेवला नाही. त्यामुळे आम्ही चर्चा कशावर करणार?” अशी खंत कामगार नेते शशांक राव यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी येऊन फक्त तोडगा काढण्याचे सांगितले. मात्र, पुढे आयुक्त आणि व्यवस्थापक यांनी कोणताच प्रस्ताव आमच्यासमोर मांडला नाही, असेही शशांक राव यांनी सांगितले.

या बैठकीतील चर्चेची माहिती शुक्रवारी बेस्ट कर्मचाऱ्यांना मेळाव्यात देण्यात येईल, त्यात संपाबाबत पुढील भूमिका अधिक स्पष्ट करु, अशी घोषणाही यावेळी शशांक राव यांनी केली.

संपावर तोडगा निघाला नाही, तर शनिवारपासून सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारीही संपात उतरणार असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…

काय आहेत बेस्ट कर्मचा-यांच्या मागण्या?