माजी मंत्री व पलूस-कडेगाव विधानसभेचे आमदार डॉ.विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेत खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) यांच्याशी हातमिळवणी केली असून ते बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र व पलूस कडेगाव विधानसभा चे काँग्रेसचे आमदार असणारे विश्वजीत कदम हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते,पण शिंदे-फडणवीस यांच्यात झालेल्या युतीमुळे त्यांना मंत्रीपद गमवावे लागले.
खानापूर व कडेगाव तालुक्यासाठी संयुक्त असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम (Mohanrao Kadam) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (Pruthviraj Deshmukh) या तिघांची गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र सत्ता आहे गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली तेव्हा एका बाजूला भाजप आणि शिंदे गट शिवसेना व दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकासआघाडी निर्माण केली व यापुढे राज्यातील सर्व निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र काँग्रेसचे व कदम गटाचे नेते आमदार मोहनराव कदम यांच्या नंतर या गटाची धुरा वाहणाऱ्या माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी आपली जुनीच मैत्री कायम ठेवल्याचे दिसून येत आहे त्यांनी चक्क शिवसेना आणि भाजप यांच्या बरोबर युती केली आहे,त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून जिल्ह्यातील सर्व मार्केट कमिटीच्या निवडणुकीतून ठाकरे गटाने माघार घेतली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एकीला सुरुंग लागला आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसवर आरोप
नागेवाडी येथे असलेला यशवंत साखर कारखाना आमदार विश्वजीत कदम यांना विकत घ्यायचा आहे व त्या प्रकरणात अनिल बाबर यांची नाराजी नको म्हणून त्यांनी शिंदे गटाशी साटेलोटे केले, असा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी विश्वजीत कदम यांच्यावर केला आहे,तुम्ही केवळ व्यक्तिगत स्वार्थ पाहून वेगळा निर्णय घेतला परंतु हे काँग्रेसच्या मतदाराला पटले नाही अशी टीकाही त्यांनी केली व या संदर्भात वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचेही त्यांनी सांगितले
0 टिप्पण्या