Ticker

6/recent/ticker-posts

"मुस्लिम मतदार नोंदणी करु नये" ग्रामपंचायतीचा ठराव आणि वाद

 

Kolhapur-Muslim-voters-should-not-be-registered-Gram-panchayat-Resolution-and-Controversy

नवीन मुस्लीम मतदार नोंद करु नयेत असा ठरावच एका ग्रामपंचायतीने केला,यावरून वाद निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव केला. या ठरावानुसार, ‘गावात नवीन अल्पसंख्याक (मुस्लीम) मतदार नोंदवू नयेत आणि नवीन मुस्लीम मतदार नोंदवले गेले तर त्यावर ग्रामपंचायतीने हरकती घ्याव्यात.’

धक्कादायक म्हणजे, या ठरावपत्रावर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दिपाली येडके यांच्या सही आणि शिक्काही आहे. ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरच हा ठराव करण्यात आलाय. 

शिंगणापुरात ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत समाज माध्यमांवर व्हायरल झाली, त्याआधी असा काही ठराव झाल्याचे गावाबाहेर कुणालाही माहित नव्हते. मात्र ठरावाचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या व वादाला तोंड फुटलं, सोबत या ग्रामपंचायतीला स्पष्टीकरणही द्यावं लागलं आणि ठराव मागेही घ्यावा लागला आहे.

नेमका काय ठराव झाला होता?

करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीने 28 ऑगस्ट 2024 रोजी एक ठराव केला.

‘अल्पसंख्याक (मुस्लीम) मतदान नोंदणीबाबत’ असा या ठरावाचा विषय आहे.


ठरावात म्हटलं होतं की, ‘शिंगणापूर ग्रामसभा ठराव क्रमांक 29 - मौजे शिंगणापूर गावच्या गावसभेत वरील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शिंगणापूर गावच्या हद्दीतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्याक (मुस्लिम )यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत, असे सर्वानुमते ठरले

तसंच, याच ठरावात पुढे म्हटलंय की, ‘ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल, तेव्हा नवीन अल्पसंख्यांक मुस्लिम यांची नावे नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकती घेऊन सदरची नावे कमी करणेत यावीत, असे सर्वानुमते ठरले. त्यास आजची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे.’

प्रमोद संभाजी मस्कर यांचं नाव सूचक म्हणून, तर अमर हिंदुराव पाटील यांचं नाव अनुमोदक म्हणून ठरावात नमूद करण्यात आलंय.

Kolhapur Muslim voters should not be registered Gram Panchayat Resolution and Controversy
शिंगणापूर ग्रामपंचायतीचा ठराव 

ठराव समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वाद आणि माघार

शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या या ठरावाची गावाबाहेर फारशी कुणाला कल्पना नव्हती. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी या ठरावाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सर्व स्तरातून टीकेची झोड उठू लागली.
सगळीकडून टीका होऊ लागल्यानंतर शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील यांना उपरती झाली.
तसंच, सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दिपाली येडके यांनी अखेरीस स्पष्टीकरण देणारं पत्रक जारी केलं. हे पत्रकही शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर जारी करण्यात आलंय.

‘ग्रामपंचायत मौजे शिंगणापूर ता करवीरकडील सोशल मीडिया व इतर माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या ठराव पत्राअन्वये आम्ही खालीलप्रमाणे खुलासा करत आहोत,’ असं म्हणत दोन मुद्द्यांमध्ये स्पष्टीकरण दिलंय.

“ठराव पत्रकात उल्लेख केलेल्या मुस्लिम अपसंख्याक समुदायाची आम्ही जाहीर माफी मागत आहोत आणि अशी विषमता निर्माण करणारा किंवा तसा हेतू असणारा कोणताही ठराव आमच्या ग्रामपंचायतीमध्ये केला जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,” असं या नव्या पत्रकात म्हटलं आहे.

हे पत्रकाखालीही सरपंच रसिका पाटील आणि ग्रामविकास अधिकारी दिपाली येडके यांच्या सह्या आहेत.
Muslim voters should not be registered Gram Panchayat Resolution and Controversy
ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेला खुलासा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात