सांगली: कडेगांव तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी ४.५ कोटी रुपये थकीत ठिबक अनुदानासाठी टाळा ठोको आंदोलन केले. मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यापुर्वीच मनसेने ४ आक्टोंबरला शेतकऱ्यांना सोबत घेऊन कडेगांव कृषी विभागास टाळे ठोकणार असल्याचे निवेदन दिले होते. मात्र आज आंदोलन सुरू होताच कडेगांव कृषी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीयांनी 69 लाख रुपये ठिबकचे अनुदान जमा झाले असल्याचे लेखी दिले. तसेच उर्वरित अनुदान ही लवकर कार्यालयास प्राप्त होणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे आंदोलनावेळी कृषी अधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी यांना तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांची माफी मागण्यास भाग पाडले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी मनसेच्या आंदोलनांना सध्या हळूहळू यश मिळत असल्याचे सांगितले. मनसेने पाठपुरावा केल्यानंतरच केंद्र व राज्य सरकारच्या थकीत ४.५ कोटी पैकी राज्य सरकारने थकीत ६९ लाख रुपये अनुदान त्वरित जमा केले आहे. तसेच उर्वरित अनुदानही विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. आंदोलनावेळी कडेगांव पोलीसांकडून चोख बंदोबस्त होता. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, उपाध्यक्ष सतीश येताळ, बेलवडे शाखाध्यक्ष विशाल तवर, वांगी शाखाध्यक्ष संदीप मोहिते, कोतवडे शाखाध्यक्ष राधिकाताई सूर्यवंशी, श्रीराम मोहिते, विराज शिंदे,पलूस तालुका उपाध्यक्ष-दिलीप निकम,अजय मोरे, राजेश साळुंके, प्रतीक कदम आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या