घोसरवाड: संविधान दिनाच्या निमित्ताने घोसरवाड ग्रामपंचायत येथे साजरा झालेल्या कार्यक्रमात एक उल्लेखनीय घटना घडली. ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका व पुस्तिकेची अनुपस्थिती लक्षात आल्याने, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे आणि सुरज भोसले यांनी पुढाकार घेत संविधान परिवाराच्या वतीने ग्रामपंचायतला संविधानाच्या प्रास्ताविकेची फोटोफ्रेम भेट दिली.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच साहेबराव साबळे, ग्रामविकास अधिकारी मा.चव्हाण, सदस्य प्रमोद कांबळे, सदस्य राकेश कागले, लक्ष्मण नायकवाडे, धीरज कांबळे, अभिजित कर्णिक, बाबुराव डवरी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, सुरज भोसले यांनी सांगितले की, "संविधान आपल्या देशाचे सर्वोच्च कानून आहे.ज्यावर राज्यघटना चालते,पंचायतराज चालते, प्रत्येक नागरिकाला संविधानाबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कार्यालयात संविधानाचे प्रास्ताविक असणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे."
सरपंच साहेबराव साबळे यांनी संविधान परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामपंचायत कार्यालय अधिक सक्रिय आणि जनजागृतीसाठी वचनबद्ध होईल असे सांगितले.
या कार्यक्रमामुळे घोसरवाड ग्रामपंचायतला एक नवी दिशा मिळाली आहे आणि येत्या काळात संविधान जागरूकतेसाठी अधिक उपक्रम राबवण्याची अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या