पुणे

डॉ. सायरस पुनावाला यांचे नोबेलसाठी नामांकन

जगभरातील 140 देशांमध्ये लस निर्यात करून बालकांसह दीड अब्ज लोकांचे प्राण वाचविण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱया डॉ. सायरस पुनावाला यांचे यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. या माध्यमातून नोबेलसाठी नामांकन होणारे ते पुण्यातील पहिलीच व्यक्ती ठरले आहेत.

अमेरिकेतील ‘मॅसेचुसेट्स मेडिकल स्कूल’कडून (बोस्टन) सिरम इन्स्टिटय़ूटच्या सायरस पुनावाला यांना ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’ पदवीने नुकतेच गौरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुनावाला यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातच डॉ. सायरस पुनावाला यांची यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची माहिती रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ परवेज ग्रांट यांनी येथे दिली. उद्योजक अतुल चोरडिया, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, संजय दत्त, अभिनेत्री मल्लिका शेरावत आदी उपस्थित होते. या वेळी पुनावाला यांनी आपले विचार मांडताना देवाचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपण अनेक बालकांचे प्राण वाचवू शकलो, असे सांगितले.